

बार्शी /वैराग : वैराग शहरातील खेंदाड गल्ली येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास कमकुवत झालेल्या घराची भिंत अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिनल गुलाब ठोंबरे (वय ४५) व सुमन महादेव पारदे (वय ६५, दोघी रा. वैराग, ता. बार्शी) अशी मृत महिलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वैराग येथील खेंदाड गल्लीमध्ये जुने व कमकुवत झालेले घर आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास घराची भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन्ही महिला अडकल्या होत्या.
नागरिकांनी तत्परता दाखवत ढिगारा बाजूला करून दोन्ही महिलांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने वैराग येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र दोघींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात येत होते. दरम्यान, रुग्णालयात नेत असतानाच दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, कॉन्स्टेबल उमेश कंगले, कॉन्स्टेबल गणेश चव्हाण यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून या घटनेची माहिती घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे खेंदाड गल्ली परिसरात शोककळा पसरली असून, जुनी व धोकादायक घरे तसेच कमकुवत झालेल्या बांधकामांची पाहणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलिस करीत आहेत.