Pandharpur News : निसर्गाच्या लहरीपणाचा आंब्याला फटका

नुकसानभरपाईसाठी कृषिमंत्री भरणे यांना निवेदन; निमगावात गारपीट शेतीचे नुकसान
Mango crop damage
निसर्गाच्या लहरीपणाचा आंब्याला फटका
Published on
Updated on

पंढरपूर : महाराष्ट्र राज्यात काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या अवकाळी पाऊस, भीषण गारपीट आणि सतत बदलत्या हवामानाचा मोठा तडाखा आंबा उत्पादक पट्ट्यांना बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शुक्रवार दि. 20 रोजी महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सचिन नलावडे आणि शेतकऱ्यांनी नुकसानीचे निवेदन दिले. तसेच तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे. यावर्षी वातावरणातील तीव्र बदलांमुळे राज्यातील अनेक आंबा उत्पादक पट्ट्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक भागात मोहर उशिरा आला आणि त्यानंतर अचानक वाढलेल्या अति थंडीमुळे तो मोठ्या प्रमाणावर करपून गेला. त्यातच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. हजारो शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आंबा हे राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून हजारो कुटुंबांचे अर्थकारण यावर अवलंबून आहे. असे असताना हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादक सध्या पूर्णपणे हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. की, कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. आंबा बागेचे आर्थिक मूल्य लक्षात घेऊन प्रति हेक्टर किमान 10 लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करावी.

आंबा पिकासाठी स्वतंत्र आणि प्रभावी पीक विमा योजना लागू करावी. त्यात मोहोर करपणे, अवेळी पाऊस, अति थंडी आणि गारपिटीसारख्या सर्व नैसर्गिक जोखमींचा समावेश करावा. जेणेकरून शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून तातडीने परतावा मिळणे सुलभ होईल. यासोबतच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी आंबा पिकाला योग्य हमीभाव देण्याबाबत शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news