

वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावात जोरदार वादळासह जोराचा अवकाळी पाऊस झाला. या अवकाळीने शेडवर टाकलेला बेदाणा खराब झाला.अनेकांचे घरावरील पत्रे उडून गेले.
मुंगशी येथील शेतकरी अर्जून श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी जालींदर राऊत यांच्या बेदाणा शेड वर आपला द्राक्षाचा माल टाकला होता. या अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट कागद उडून गेला व झालेल्या अती पावसाने अंदाजे 7 ते 8 टन बेदाण्याचा चिखल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे . वर्षभर पोटच्या लेकरांप्रमाणे संभाळलेली द्राक्ष बाग तसेच ती संभाळण्यासाठी महागडी औषधे, खते , मजूरी यावर झालेला अमाप खर्च करून हातातोंडाशी आलेला घास एका क्षणात नाहीसा झाला. यामुळे झालेल्या कर्जाचा डोंगर फेडायचा कसा व पुढील संकटांचा सामाना करायचा कसा हा मोठा प्रश्न आहे.
काही शेतकऱ्यांचे पिक अजून झाडावर आहे तरी काहींनी आपला माल शेडवर टाकला आहे . यामुळे झालेल्या या अस्मानी संकटाच्या नुकसानीतून बळीराजा सावरणार कसा हा मोठा प्रश्न आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे व बेदाणा शेडचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.