

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्र ग्रंथालयाने विद्यार्थ्यांनी पुस्तके वेळेवर परत न केल्याने मागील वर्षभरात एक लाख रुपये दंड जमा केला आहे. विद्यापीठात 11 संकुलांमध्ये पाच हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतात. या सुसज्ज ग्रंथालयातून पाच हजार 640 विद्यार्थ्यांनी वर्षभरात पुस्तके वाचली आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी दोन पुस्तके 15 दिवसांसाठी घेऊ शकतो. परंतु वेळेवर परत न केल्यास प्रति दिवसाला एक रुपया दंड आकारला जातो.
हा दंड विद्यार्थ्यांच्या निष्काळजीपणामुळे जमा झाला आहे. ग्रंथालयाच्या नियमांचे पालन न केल्याचा हा परिणाम आहे. ग्रंथालयात विविध विषयांवरील पुस्तकांचा समृद्ध संग्रह आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. तरीही, पुस्तके वेळेवर परत न करण्याची सवय विद्यार्थ्यांना महागात पडली आहे. या दंडाच्या रकमेतून ग्रंथालयाच्या देखभालीसाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो, परंतु विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करून दंड टाळावा. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान टळेल आणि ग्रंथालयातील पुस्तकांचा इतरांना वेळेवर लाभ मिळेल. यासोबतच विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायला हवी आहे.
विद्यापीठाच्या ग्रंथालयात 50 हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. या संग्रहात विद्यापीठात शिकवली जाणारी पाठ्यपुस्तके, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ, तसेच कन्नड, तेलुगू आणि इंग्रजी यांसारख्या विविध भाषांमधील पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय कथा, कादंबर्या, संत वाङ्मय आणि दलित वाङ्मय अशा विविध साहित्य प्रकारांची पुस्तकेही येथे वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
विद्यापीठातील ग्रंथालयात आरएफआयडी तंत्रज्ञान असल्याने पुस्तक परत करताना त्याचा टॅग स्कॅन करताच ते किती दिवसांनी उशिरा परत आले याची नोंद होते. त्याचवेळी तुमच्या खात्यावर किती दंड आकारला आहे, हे संगणकाच्या स्क्रीनवर दिसते.