

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ४९८ एकर परिसरातील दोन एकर जागेत खेलो इंडिया योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा मल्टिपर्पज इनडोअर स्पोर्ट्स हॉल अंतिम टप्प्यात आला आहे. ६० बाय ४० मीटर आकाराच्या या हॉलसाठी १४ कोटी ५० लाख रुपये खर्च आला आहे. यात ५ हजार प्रेक्षकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी खेलो इंडिया अंतर्गत विद्यापीठाला ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. विद्यापीठाने १० कोटी रुपये खर्च केले आहेत. सध्या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून फायर फायटिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे दीड महिन्यात हॉल विद्यापीठाच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
या हॉलमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कुस्ती, ज्युदो, बॉक्सिंग, कराटे, तायक्वांदो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, फुटसल, इनडोअर आर्चरी, बॉलिंग आणि वेटलिफ्टिंगसह १५ पेक्षा अधिक खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध इनडोअर स्पर्धां घेता येतील. मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी बीपीएड व एमपीएड अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्तावही सोलापूर विद्यापीठाने मंजुरीसाठी पाठविला आहे.
इनडोअर हॉलची वैशिष्ट्ये
l पाऊस आला तरी स्पर्धा थांबणार नाही l आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सक्षम
l ५ हजार प्रेक्षकांची आसनव्यवस्था l १५ पेक्षा अधिक खेळांची सुविधा
l बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन