सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विधानसभा निवडणुकीनंतर मंगळवारपासून (दि. २६) सुरू होणार होत्या. मात्र, निवडणुकीच्या ड्युटीसाठी टिचिंग, नॉनटिचिंगमधील कर्मचारी व्यस्त होते. निवडणूक संपली असली, तर अद्याप काहीजणांचे परीक्षा अर्ज भरायचे राहिले आहेत. त्यासाठी दोन डिसेंबरची मुदत महाविद्यालयाने मागितली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या बी.ए., बी. कॉम., बी.एस्सी. यासह विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. सहा नोव्हेंबरपासून या परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, आचारसंहिता लागू झाली व कर्मचाऱ्यांना निवडणुकीची ड्युटी लागली. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून घेवू असे परीक्षा विभागाच्या वतीने जाहीर केले होते. त्यामुळे तसे नियोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी मिळाला होता. मात्र आता निवडणूक संपली, कर्मचाऱ्यांची ड्युटी संपली आहे. मात्र काही जणांचे परीक्षा अर्ज भरायचे आहे. यासाठी २ डिसेंबरपर्यंत मुदत द्या अशी मागणी महाविद्यालयाने केली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ३० ते ३५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेची बाकी तयारी पूर्ण झालेली आहे. परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी, कॉपी केसेस होवू नये म्हणून योग्य खबरदारी घेण्यात येणार आहे.
• एकुण महाविद्यालये - १०९
• एकुण विद्यार्थी ७० हजार
• शहर व ग्रामीण भागात तीन भरारी पथक
• पहिल्या टप्प्यात ३० हजार विद्यार्थी परीक्षा देणार
• प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीची असणार करडी नजर
नवीन शैक्षणिक धोरणांनुसार विद्यापीठाच्या परीक्षा २६ नोव्हेंबरला होणार होती. मात्र निवडणुकीमुळे पुढे ढकलली. निवडणुक जरी संपली असली तरी परीक्षेच्या काही कामकाजामुळे परीक्षा पुढे ढकलली आहे. तसे महाविद्यालयास कळवले आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेवू, तारीख आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करू.
डॉ. श्रीकांत अंधारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सोलापूर विद्यापीठ
विद्यापीठाच्या परीक्षा या उद्या मंगळवारपासून (दि. २६) सुरु होणार होत्या. तशी तयारीही केली होती. मात्र अद्याप हॉल तिकीट आले नाही. त्यामुळे उद्या परीक्षा होणार की नाही हे अद्याप माहिती नाही.
श्रेयश शिंदे, विद्यार्थी, मंगळवेढा