

सोलापूर ः सिद्धेश्वर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या होटगी शिवारातील एका शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उडी मारलेल्या विवाहित तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 8) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सादिक अ. हमीद शेख (वय 32, रा. नई जिंदगी, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
हुरडा पार्टीनंतर मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या सादिक शेख यांचा विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळात अडकल्याने दुर्दैवी अंत झाला. माहिती मिळताच वळसंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून सादिक शेख याला पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मृताच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशी व न्यायाची मागणी केली आहे. सादिक शेख हा व्यवसायाने इलेक्ट्रिशिअन होता. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व चार बहिणी असा परिवार आहे.