

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजताच्या आकडेवारीनुसार, धरणात केवळ ६१.१३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी याच दिवशी उजनी धरण १०० टक्के भरलेले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २०.८२ टीएमसीने उपयुक्त पाणीसाठा कमी आहे.
उजनी धरणाची सध्याची पाणीपातळी ४९४.९२५ मीटर असून, एकूण पाणीसाठा ९६.४१ टीएमसी इतका आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ३२.७५ टीएमसी आहे. गतवर्षी याच दिवशी धरणातील एकूण साठा ११७.२३ टीएमसी, तर उपयुक्त साठा ५३.५७ टीएमसी होता. यंदा पाणीपातळीतही गतवर्षीच्या तुलनेत घट झाली असून, ती ४९६.८३० मीटरवरून ४९४.९२५ मीटरवर आली आहे.
यंदा पावसाळ्यात एकूण २२५ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. दुसरीकडे, धरणातील पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत असल्याने साठ्यात आणखी घट होत आहे. सध्या बाष्पीभवनामुळे ०.९४ दशलक्ष घनमीटर पाण्याचा ऱ्हास होत आहे.धरणातून सध्या केवळ सिना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी २४० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
काटकसरीने पाणी वापरण्याचे आव्हान
स्पिलवे, पॉवर हाऊस, रिव्हर स्लुईस, दहिगाव उपसा सिंचन योजना, बोगदा आणि मुख्य कालव्यातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील उपयुक्त पाणीसाठा लक्षणीयरीत्या कमी असल्याने आगामी काळातील पाणी नियोजनाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. रब्बी हंगामातील सिंचन, शहरांसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि उन्हाळ्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर उभे राहिले आहे.