

माढा : उजनी धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची तब्बल १९.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता कमी झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय जल आयोगाच्या जलसर्वेक्षण अहवालातून समोर आली आहे. गाळामुळे उजनीच्या एकूण साठवण क्षमतेत १६.४२ टक्के, तर जिवंत साठवण क्षमतेत १२.०४ टक्के घट झाली आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी १० ऑगस्ट रोजी केंद्रीय जल आयोगाकडे उजनी धरणाच्या जलसर्वेक्षण व गाळ साचण्याबाबत माहिती मागवली होती. त्यावर पाणलोट व जलाशय गाळ निवारण संचालनालयाने २ सप्टेंबर रोजी दिलेल्या उत्तरातून उजनीतील गाळाची गंभीर स्थिती स्पष्ट झाली.
केंद्रीय जल आयोगाच्या सर्वेक्षणानुसार, उजनी धरणाची मूळ एकूण साठवण क्षमता ११७.२५ टीएमसी होती. मात्र, २०२३ मध्ये केलेल्या जलसर्वेक्षणानुसार सध्याची अंदाजित एकूण साठवण क्षमता ९८.०० टीएमसी इतकीच राहिली आहे. म्हणजेच गाळ साचल्यामुळे धरणाच्या एकूण साठवण क्षमतेपैकी तब्बल १९.२५ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. ही घट एकूण क्षमतेच्या १६.४२ टक्के इतकी आहे.
उजनीच्या जिवंत साठवण क्षमतेवरही गाळाचा मोठा परिणाम झाला आहे. मूळ आराखड्यानुसार जिवंत साठवण क्षमता ५३.५९ टीएमसी होती. ती आता ४७.१५ टीएमसी इतकी राहिली आहे. त्यामुळे जिवंत साठ्यात ६.४५ टीएमसीची घट झाली असून ही घट सुमारे १२.०४ टक्के आहे. उजनी धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर जिल्ह्यासह लाभक्षेत्रातील शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि औद्योगिक गरजा लक्षात घेता, साठवण क्षमतेतील ही घट भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी गंभीर बाब ठरणार आहे.