

मोहोळ : मोहोळ-सोलापूर महामार्गावर मोहोळपासून पाच किलोमीटर अंतरावर सोमवारी अवघ्या तासाभराच्या अंतराने एसटी बसचे दोन अपघात झाले. सोलापूरकडे जाणाऱ्या एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला धडक दिली, तर सोलापूरकडून मोहोळकडे येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. या दोन्ही अपघातांत दोघांचा मृत्यू तर एक जखमी आहे. दोन्ही एस. टी. चालकावर गुन्हा दाखल झाला.
चंद्रकांत कृष्णा बरडे (वय ६४, रा. मानेगाव, ता. माढा), शिवाजी आप्पा महापुरे ( ५२ रा. मार्डी ता. उत्तर सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. दुचाकीवरील कल्पना शिवाजी महापुरे (वय ५२) या जखमी झाल्या. उमेश बाळासाहेब निंबाळकर (रा. वाठार निंबाळकर ता. फलटण) व हरिभाऊ जाधव (रा. फलटण) या दोन चालकांवर गुन्हा दाखल झाला.
वडवळ गावच्या शिवारात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत बरडे हे रस्ता ओलांडत असताना त्यांना फलटण-तुळजापूर या एसटी बसने (क्र. एम.एच. २० जी.सी . ३०४१) धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी पोपट चंद्रकांत बरडे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून एस.टी. चालक उमेश बाळासाहेब निंबाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरा अपघात दुपारी एकच्या सुमारास झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील शिवाजी महापुरे व कल्पना महापुरे हे पती-पत्नी मार्डी वरून मोटारसायकलने (क्र. एमएच १३ एएच ५८९६) मोहोळ येथील मुलीला भेटावयास निघाले होते. त्यांची मोटारसायकल चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ येताच तुळजापूर ते मेढा या एस.टी. बसने (क्र. एमएच १४/बीटी ४८४१) भरधाव वेगात मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात शिवाजी महापुरे यांना बसने २५ ते ३० फूट फरफटत नेल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पत्नी कल्पना महापुरे यांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवलेे. याप्रकरणी अविनाश शिवाजी महापुरे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे.