

सोलापूर : सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन आंतरजिल्हा गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले, यात एका महिलेचा समावेश आहे. कोमल विनोद राठोड (वय 45, रा. इंदिरा नगर, व्हीआयटी कॉलेज शेजारी, पुणे) व लखन चंदन पवार (30, रा. खोपडे नगर, कात्रज, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून सोन्याचे दागिने, चारचाकी गाडीसह आठ लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
बार्शी शहरातील सराफ बाजारातील हळद गल्ली येथील सोन्याच्या दुकानातून सोन्याची चोरी झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे व. पोलिस निरीखक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक विजय शिंदे हे या गुन्ह्याचा तपास करीत होते. हा गुन्हा रेकॉर्डवरील महिला गुन्हेगार कोमल राठोड व लखन पवार या दोघांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या दोघांच्या शोधासाठी पथक पुणे येथे रवाना झाले.
दोघेही आंबेगाव, कात्रज येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता बार्शीसह त्याच दिवशी परांडा येथील सोन्याच्या दुकानातही चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून 9.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरेली चारचाकी गाडी असा एकूण 8 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, व. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विजय शिंदे, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, रवी माने, आश्विनी गोटे, अन्वर अत्तार, मनोज राठोड, सूरज रामगुडे, विनायक घोरपडे, सुनंदा झळके, आषुतोश जाधव यांनी पार पाडली.