

सोलापूर : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून येत असताना विजयपूर रस्त्यावर हत्तूर उड्डाणपुलाजवळ मंगळवारी (दि. २) पहाटे घडलेल्या भीषण अपघातात दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयतांमध्ये रहमान मौला ढवळगी (४८) आणि राजू इमामसाब शेख (३५) यांचा समावेश आहे. दोघेही शहरातील सलगर वस्ती येथे राहणारे होते.
रहमान ढवळगी व राजू शेख हे त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विजापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले होते. वाढदिवस साजरा करून मोटरसायकलने सलगर वस्तीकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीस मालट्रकने (एम.एच. १३ ई.पी. २३४०) समोरुन धडक दिली. यामध्ये रहमान यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजू इमामसाब शेख हे गंभीर जखमी झाले. त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
मयत रहमान ढवळगी यांच्यामागे आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, चार भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कबड्डी खेळाडू होते. सध्या ते फर्निचरचे काम करत होते. मयत राजू शेख यांच्यामागे पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. ते सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाणी विक्रीचा व्यवसाय करत होते. या अपघातानंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या संख्येने नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती. विजापूर नाका पोलिस या अपघाताचा तपास करीत आहेत.