

सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळील स्मशानभूमीत एका तृतीयपंथीयाने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अभिजित ऊर्फ कोमल हरिबा नागटिळक (वय २२, रा. साईनगर, साखर कारखान्याजवळ, होटगी रोड, सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
अभिजित हा सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळील स्मशानभूमीत लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी त्यास खाली उतरवले. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार एन. सी. सांगळे यांनी रात्री साडेआठच्या सुमारास अभिजितला सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर ओंकार येमूल यांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. विजापूर नाका पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, रविवार (दि. २०) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी शहरातील तृतीयपंथीयांनी सिव्हिल रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.