

टेंभुर्णी : टेंभुर्णी शहरात व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून पोलिसांनी वाघाचे कातडे व हस्तीदंत हस्तगत केला. या दोन्हीची किंमत ३ लाख ५० हजार रुपये आहे. ही कारवाई शनिवारी (दि.२१) सांयकाळी पाच वाजता टेंभुर्णी पोलिसांनी केली. अमोल विजयकुमार शहा (वय ४५, रा.ढवळेनगर, टेंभुर्णी, ता.माढा) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
याबाबत अधिक माहिती अशी, अमोल शहा यांच्या घरात वाघाचे कातडे व हस्तिदंत असल्याची माहिती खबऱ्याकडून टेंभुर्णी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी कुर्डुवाडी रोडवरील शहा याच्या घरी पंचासमक्ष धाड टाकली. यावेळी घराची झाडाझडती घेत असताना एका पिशवीत २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे वाघाचे कातडे पोलिसांना आढळून आले. तसेच वाघाचे चार सुळे दात व अर्धवट तुटलेले ११ दात मिळून आले. याबरोबरच एक लाख रुपये किंमतीचा एक हत्तीचा दात मिळून आला. असा एकूण साडेतीन लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी शहा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला माढा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.