

सोलापूर : येथील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल मिल टॉवेल कारखान्याला रविवारी (दि. 18) पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ जणांचा होरपळून जागीच अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये कारखाना मालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह तीन कामगारांचा समावेश आहे.
कारखाना मालक उस्मान हासन मन्सुुरी (वय 78), शिफा अनस मन्सुरी (24), युसूफ अनस मन्सुुरी (1 वर्ष), अनस हनिफ मन्सुरी (24, सर्व रा. अक्कलकोट रोड, एमआयडीसी कारखाना परिसर), आयेशाबानो महताब बागवान ( 52, रा. गवळी वस्ती, एमआयडीसी), महताब बागवान (51), हिना बागवान (35), सलमान बागवान (18) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.
अक्कलकोट एमआयडीसीमध्ये उस्मान मन्सुुरी यांचा टॉवेल कारखाना आहे. या कारखान्यात तयार होणारे टॉवेल परदेशात निर्यात केले जातात. तीन ते चार एकरांत हा कारखाना आहे. दोन मजली इमारत आहे. तीन पाळ्यांमध्ये काम चालते. तब्बल 300 ते 400 कामगार याठिकाणी आहेत.
कारखान्याच्या दुुसर्या मजल्यावर मन्सुरी परिवार राहण्यास आहेत. उस्मान हासन मन्सुुरी यांचा मुलगा मुंबईत राहतो. तेथूनच निर्यातीचे काम पाहतो. शनिवारी रात्री मालक उस्मान मन्सुुरी हे मुंबईहून सोलापुरात आले होते. रात्री झोपल्यानंतर रविवारी पहाटे लागलेल्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
पहाटे साडेतीन वाजता अचानक आग झागल्याचे समजताच कारखान्यातील सुरक्षा रक्षकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या. त्याचवेळी एक मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशामक जवानांनी मदत कार्य चालू केले. कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मदतकार्य करण्यास मोठ्या अडचणी येत होत्या.
उंच शिडीच्या माध्यमातून अग्निशामक दलाचे जवान आणि अधीक्षक राकेश सांळुखेे आत आग लागलेल्या भागात गेले. तीन कामगारांचे मृतदेह सकाळी बाहेर काढले. तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरींसह इतर सदस्यांचा शोधचालू केला. मात्र मोठ्या प्रमाणात आग आणि धुुराचे लोट असल्याने मदत कार्य करण्यास अडचणी येत होत्या. तब्बल 14 तासांच्या प्रयत्नानंतर पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्याास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. सर्व मृतदेह सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. मृतदेहांचे पंचनामे रात्री उशिरापर्यंत चालू होते. मयतांचे नातेवाईक, मित्रमंडळींनी शासकीय रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.
सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्स्टाईल युनिटला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री