

सोलापूर : सोलापूरला कौशल्य प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जागतिक स्तरावरील गारमेंट हब बनविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन गारमेंट हब बनविणार असल्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने मुंबई येथे आयोजित केलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर 2025 चे उद्घाटन बुधवारी गोरेगावात झाले. त्यावेळी नार्वेकरांनी हे आश्वासन दिले. यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख यांच्यासह कारखानदार उपस्थित होते. नार्वेकर म्हणाले, सोलापूरला जागतिक गारमेंट हब होण्याची पूर्ण संधी असून, त्यासाठी प्रयत्न करणार आहे.
प्रदर्शन जागतिक स्तरावर भरविणार : देशमुख
या वार्षिक प्रदर्शनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जाण्याचा मानस आहे. वस्त्रोद्योग मंत्री असताना सोलापूरपासून सुरु झालेले गारमेंट प्रदर्शन देशाच्या विविध राज्यांमध्ये आयोजित केले. त्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. जागतिक स्तरावरसुद्धा त्याचा बोलबाला झाला आहे. आता लवकरच हे प्रदर्शन जागतिक स्तरावर भरविण्याचा आमचा मानस असल्याचे मत आ. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
प्रदर्शनात दीडशेहून अधिक ब्रँड्स सहभागी
प्रदर्शन नेसको एक्झिबिशन सेंटर, हॉल क्रमांक चार येथे 26 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनामध्ये 150 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्स सहभागी आहेत. 30 हजार युनिफॉर्म डिझाईन्स, 15 हजार फॅब्रिक इनोव्हेशन्सचे हे प्रदर्शन आहे. भारतातील युनिफॉर्म उद्योगातील पहिला ङ्गएआयफ आधारित व्हर्च्युअल फॅशन शो या प्रदर्शनात आयोजित केला गेला आहे. 65 अब्ज डॉलर्सच्या जागतिक युनिफॉर्म मार्केटमध्ये वाढीच्या संधी उघडणारे ङ्ग मेक इन इंडियाफला पाठबळ देणारे हे एक महत्त्वाचे बीटूबी व्यासपीठ आहे.