

सोलापूर : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सोलापुरातून विमानसेवा सुरु झाली आहे. येत्या आठवडाभरात सोलापूर-तिरुपती विमानसेवा सुरु होणार आहे. त्याबाबत प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस सुरू होणार आहे. याबाबत संबंधित विमान कंपनीने घोषणा केली आहे. मुंबईहून दुपारी एक वाजता उडाण घेऊन दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सोलापूरला पोहोचेल. तर सोलापूरहून दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी उडाण घेऊन मुंबईला दुपारी तीन वाजून पंच्चावन्न मिनिटांनी पोहोचेल.
बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करण्यात आले. परंतू ती जागा माळढोकसाठी आरक्षित असल्याने तो विषय तिथेच थांबला. परंतु सुमारे 60 कोटी रुपये खर्चून होटगी रोडवरील विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिले विमान सोलापूर ते गोवा असे सुरु करण्यात आले. त्यास सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गोव्याला जाण्यासाठी सोलापूरसह लातूर, विजयपूर, इंडी, धाराशिव येथील प्रवासी होटगी रोड विमानतळाचा लाभ घेत आहेत. अनेक जण बेंगळूरुला जाण्यासाठी सोलापूर-गोवा विमानसेवेचाही लाभ घेत आहेत. त्यानंतर सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यात आली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता सोलापूर-मुंबई-इंदौर अशी विमानसेवा विस्तारीत करण्यात आली आहे.
इंदौरसाठी ही सेवा आठवड्यातून तीन दिवस चालू असून, पुढील आठवड्यापासून शुक्रवार वगळता सलग सहा दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. सोलापूरहून मुंबईसाठी स्टार एअरची विमानसेवा दररोज दुपारी तीन वाजता असून, सदर विमान दुपारी चार ते सव्वाचारच्या दरम्यान मुंबईत दाखल होते. त्यानंतर अर्धा ते पाऊण तासाच्या विश्रांतीनंतर हेच विमान पुन्हा इंदौरकडे उड्डाण घेणार आहे.