

सोलापूर : कुत्र्यास फिरवण्यासाठी घेऊन गेलेल्या इसमाच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे लॉकेट दोघा चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेल्याची घटना न्यू पाच्छा पेठेत मंगळवारी (दि. १) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
नागनाथ अंबाजी गोरट्याल (वय ५९, रा. युनिक रेसिडन्सी, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. नागनाथ हे त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घेऊन गेले होते. न्यू पाच्छा पेठेतील मोतीवाला डेव्हलपर्ससमोर दोन इसम दुचाकीवरुन आले. काही कळायच्या आत दोघांनी नागनाथ यांच्या गळ्यातील एक लाख ६० हजार रुपयांचे तीन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट हिसका मारुन पळवले. त्यानंतर ते अशोक चौकाच्या दिनेशे पळून गेले. नागनाथ यांनी लागलीच आराडाओरड करुन परिसरातील नागरिकांना जमा केले त्यानंतर पोलिसांना पाचारण केले.
याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यू पाच्छा पेठ हा शहरातील अतिशय गजबजलेला व मुख्य परिसर आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास येथून चेन स्नॅचिंगची घटना घडल्याने परिसरात घबराहटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पहाणी करुन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा तपास सहा. पोलिस निरीक्षक विलास पाटील हे त्यांच्या टीमसह करीत आहेत.