

सोलापूर : सोलापूर-हैदराबाद रोडच्या दिशेने जाणारा सिमेंट बल्करचे टायर फुटून बल्कर थेट गॅरेजमध्ये घुसला. या अपघातात बल्करने चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी झाले आहेत.ही घटना शनिवारी (दि.१५) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. सोलापूर-हैदराबाद रोडवरील हॉटेल जगदंबा येथे घडली. तोहिद माजीद कुरेशी (वय २०, रा. सरवदे नगर सोलापूर), आसिफ चांद पाशा बागवान (वय ४५, रा. दर्गे पाटील नगर, हैदराबाद रोड) तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज (रा. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास बल्कर (क्रमांक एम एच 44 यू 7495) सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने हा सिमेंट बल्कर जात होता. बल्काराचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टायर फुटल्याने बल्करने दुचाकीला धडक देत तो थेट उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसला. यावेळी गॅरेजमध्ये काही लोक बसलेले होते. या सर्व लोकांना बल्करने चिरडले. जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या परिसरात अपघात झाला, त्या रस्त्यावर वळण मार्ग आहे. हीच बाब या अपघाताला ही कारणीभूत ठरवल्याची प्रत्यक्ष दर्शनी पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.