

सोलापूर : ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी चारचाकीतून येऊन कुलूपबंद असलेली घरे हेरून तेथे घरफोडी करणार्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले.
सुभाष शंकर काळे (वय 32, रा. माळेवाडी संजयनगर अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व सागर चंदू साळुंखे (वय 30, रा. उमराणी रोड जत, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 घरफोड्या उघडकीस आणून 137 ग्रॅम सोन्याचे व 1,286 ग्रॅम चांदीचे दागिने आदीसह एकुण 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. काही महिन्यापूर्वी शाहूवाडीत घरफोडी झाली होती. पोलिस त्याचा तपास करत होते. पोलिसांना काळे व त्याच्या साथीदाराने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळे व त्याच्या साथीदारांवर लक्ष केंद्रीत केले होते. काळे हा सांगली फाटा येथे सर्व्हिस रोडवरून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळाले. पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली.
काळे याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर साळुंखे हा त्याचा साथीदार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सांगली जिल्हा पोलिसांनी साळुंखे याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. कोल्हापूर पोलिसांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधून त्याचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी शाहूवाडीत 2, कोडोली - 1, वडगाव - 3, हातकणंगले - 4, शिरोळ - 3, इस्पुर्ली - 1 व कागल 1 अशा 15 घरफोड्या केल्याची कबुली दिली.
काळे, साळुंखे व त्यांचे इतर साथीदार रात्रीच्यावेळी चारचाकीतून ग्रामीण भागात फिरून कुलूपबंद घरे हेरत होते. त्यानंतर रिस्क नसल्याचे पाहून घरफोडी करून सोन्याचांदीच्या दागिन्यावर डल्ला मारत होते. जाताना ते चोरी केलेल्या दागिन्यांची आपसात वाटणी करत होते, असे पोलिसांनी सांगितले.