Solapur Theft : चोरट्यांचा १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

मोहोळ शहरात खळबळ
Jewellery Theft
Jewellery Theft(Pudhari Photo)
Published on
Updated on

पोखरापूर : मोहोळ शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या देशमुख गल्ली परिसरात दिवसाच चोरट्यांनी घरातील फर्निचर कपाटात आई व मुलीचे ठेवलेले तब्बल २६.५ ग्रॅमचे १५ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना दि. ५ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात चोरट्याच्या विरोधात दि. १० ऑगस्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोहोळ शहरात खळबळ उडाली आहे.

संजय विलास पडवळकर, रा. देशमुख गल्ली, मोहोळ हे वरील ठिकाणी एकत्र कुटुंबीयांसमवेत राहण्यास असून, मोहोळ रेल्वे स्टेशनच्या जवळ शेती करून त्यावर कुटुंबाची उपजीविका करतात. दि. ४ रोजी संजय पडवळकर यांच्या आईने वरील सर्व दागिने एकत्र करुन त्यांच्या खोलीतील लाकडी फर्निचरच्या कपाटामधील ड्रॉवरमध्ये ठेवले व कपाटाला लॉक करुन चावी दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिळ्याला अडकवून ठेवली. त्यानंतर दि. ५ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्‍या दरम्यान फिर्यादी संजय पडवळकर व त्यांचे आई-वडील, भाऊ भावजय, मुलगा व पुतण्या असे मोहोळ रेल्वेस्टेशन येथे असलेल्या शेतात काम करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या दोन सुना या घरीच आपापल्या खोलीमध्ये त्यांच्या कामात मग्न होत्या.

त्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास सर्वजण शेतातून घरी आल्यानंतर घरी चालू असलेल्या बांधकामाच्या कामगारांना पगार देण्यासाठी संजय पडवळकर यांनी आईकडे पैसे मागितले असता, त्यांच्या आईने त्यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता तिच्या खोलीतील लाकडी फर्निचरच्या कपाटाची चावी त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. पडवळकर यांनी मित्राकडून उसने पैसे घेवून बांधकाम कामगारांच्या पगार दिला.

त्यानंतर दि. ९ रोजीपर्यंत खोलीतील लाकडी फर्निचरच्या कपाटाची चावी मिळून न आल्याने त्यांनी दुसऱ्या कपाटाच्या चावीने पकडीच्या साहायाने सदर कपाटाचे लॉक उघडले. कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले दागिने दिसून आले नाहीत. त्यावेळी त्यांना कपाटातील दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची खात्री झाली. याप्रकरणी संजय पडवळकर यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news