Solapur ATM theft: चोरट्यांनी चक्क एटीएम मशिनच पळवले

सोलापुरातील विडी घरकूल परिसरातील घटना
ATM Theft
ATM Theft Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील विडी घरकूल परिसरातील सग्गमनगर येथील एटीएम मधील मशिनच चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.15) मध्यरात्री घडली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर बँकेचे अधिकारी व पोलिसांची तारांबळ उडाली.

विडी घरकुल परिसरातील सग्गम नगर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी चार चाकी वाहनाच्या मदतीने एटीएम मशिनला दोरखंड बांधला आणि मशिन बाहेर ओढून नेली. त्यानंतर मशिन गाडीत घालून चोरटे पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बँकेचे अधिकारीही घटनास्थळी आले. एटीएम रूममध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे तर बाहेर एक कॅमेरा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सर्व फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, चोरीला गेलेल्या एटीएम मशिनमध्ये नेमकी किती रक्कम होती, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. शनिवारी सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता थेट बँकेच्या एटीएमवरच चोरट्यांनी हात साफ केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news