

पंढरपूर : सोन्या-चांदीच्या दुकानात घुसून दुकानात झोपलेल्या दुकानदाराला तलवार व बंदुकीचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लुटमार केली आहे. या घटनेत 6 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिसंगी (ता. पंढरपूर) येथे घडली आहे.
अक्षय सुखदेव कोळेकर (वय 26, रा. कोळेकर मळा, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांचे तिसंगी (ता. पंढरपूर) येथे मायाक्का ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी दुकान बंद करून दुकानात झोपले. बुधवारी रात्री एकच्या सुमारास दुकानात अनोळखी चार इसम आले. दुकानात झोपलेल्या दुकानदारावर तलवारीने हल्ला केला. तसेच एका इसमाच्या हातात बंदुकीसारखी दिसणारी एक वस्तू होती. त्यातील एकाने तलवार कोळेकर यांच्या डाव्या खांद्यावर आडवी मारली. डाव्या पायाच्या नडगीवर मारून व तोंडावर ठोसे मारून, आवाज करू नको म्हणून मारहाण केली. तेव्हा त्यातील एकाने बंदुकीसारखी दिसणारी एक वस्तू रोखून धरली. आवाज करु नको, नाहीतर तुला मारीन, अशी धमकी दिली आणि दोघा चोरट्यांनी झोपलेल्या ठिकाणीच दुकानदाराला दाबून ठेवले. तर दोघा चोरट्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गेले.
यामध्ये 4 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने. त्यामध्ये डोरली 7 नग, बुगडी 8 नग, कान रिंगा 10 जोड, वेल 1 नग, नेकलेस 1 नग, मणी 15 ग्रॅम वजनाचे, झुबे 2 नग, बाली 12 नग आणि 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 2 किलो वजनाचे चांदीचे दागिने त्यामध्ये पैंजण, कडे, जोडवी, ब्रेसलेट, चेन, निरंजन, समई, 1 तांब्या व 1 लाख रुपयांची रोख रक्कम, असा एकूण 6 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे.