World Theatre Day: सोलापूर रंगभूमीचा विकास : गिरणगाव ते प्रयोगभान !

कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या सीमेवरचा सोलापूर जिल्हा बहुभाषिक आहे. या सगळ्याचं मनोरम प्रतिबिंब सोलापूर आणि परिसरातील रंगभूमीत पडलं आहे
Theatre
TheatrePudhari
Published on
Updated on

रजनीश जोशी

सोलापूर: प्रदेश, भाषा, लोकजीवन आणि राहणीमान, लोकसंस्कृती, जनमानस, वातावरण, समृध्दी या सर्वांचा विचार करता सोलापूर आणि परिसरातील रंगभूमीचा विकास प्रचंड झाला आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या सीमेवरचा सोलापूर जिल्हा बहुभाषिक आहे. या सगळ्याचं मनोरम प्रतिबिंब सोलापूर आणि परिसरातील रंगभूमीत पडलं आहे.

कन्नडमधून मराठी आणि मराठी संगीत नाटकातून कन्नड वा तेलुगुतील प्रयोग असं आदानप्रदान इथं झालं आहे. ‌‘वत्सलाहरण‌’ किंवा ‌‘रामजन्म‌’ यासारख्या नाटकांचे प्रयोग 1874 साली झाल्याची नोंद येथे आढळते. सोलापुरातील जुन्या विठ्ठल मंदिरात करवीरकरांनी त्यांचे प्रयोग केले. 1895 ते 1900 या पाच वर्षांत सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्यसंस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते.

‌‘एकच प्याला‌’चे तेलुगू ‌‘सुरा वंशहरा‌’

संगीत रंगभूमी आणि बालगंधर्वांबद्दल सोलापूरकरांच्या मनात अगाध प्रेम. त्यांच्या गाण्याने वेडावलेले रसिक मग स्वतःच संगीत नाटके सादर करू लागले पण ते तेलुगुतून. ‌‘एकच प्याला‌’ हे नाटक ‌‘सुरा वंशहरा‌’ या नावाने 1934 साली विष्णू प्रासादिक नाट्य मंडळाने सादर केले. ‌‘सीता स्वयंवर‌’, ‌‘राजा हरिश्चंद्र‌’ नाटकेही तेलुगुतून सादर झाली.

सहा महिने चाललेले ‌‘सं. शारदा‌’

इंग्लंडमधील ग्लोब थिएटरमध्ये एकाच नाटकाचे प्रयोग अनेक महिने चालत असल्याच्या वार्ता आपल्याला ऐकून ठाऊक असतात, किंवा माऊस ट्रॅप हे रहस्यप्रधान नाटक सतत 36 वर्षे सुरू असून, ते सादर करणाऱ्या नटांच्या तीन पिढ्या उलटल्याचं आपण जाणून आहोत. सोलापुरातही अशाच पध्दतीने बालगंधर्वांच्या संगीत शारदा या नाटकाचे प्रयोग सहा महिने सतत नूतन संगीत सभागृहात सुरू होते.

उर्दू आणि हिंदी नाट्यप्रयोग

डॉ. जी. एम. पटेल, राजा बागवान, इसाक मनियार यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी उर्दू एकांकिका आणि हिंदी नाटके सादर केली आहेत. या नाटक-एकांकिकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील बरीचशी नाटके मराठीतून उर्दू किंवा हिंदीत भाषांतरीत केलेली असत. उर्दू एकांकिकांचा चाहता वर्ग ध्यानात घेऊन राज्य सरकारनं सोलापुरात 1980 पासून उर्दू एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरवात केली. त्यात पुन्हा मराठी कलावंत हिंदी-उर्दूचा लहेजा शिकून भूमिका करीत. स्पार्टक्स हे बादल सरकाराचं नाटक किंवा आधे अधुरे, मासूम (निष्पापचं हिंदी रूप), गाना पंचरंगी तोतेका (गाणं पंचरंगी पोपटाचं हिंदीत), षड्ज (अनु. निशिकांत ठकार) अशा नाटकांचा उल्लेख करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news