

सोलापूर : अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे सोलापुरातील हॅण्डलूम, गारमेंटला सुमारे 250 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापुरातील निर्यातदार, उद्योजकांचे टेन्शन वाढले आहे. निर्यात बंद झाली, तर उत्पादनावर परिणाम होऊन रोजगारही घटू शकतो. त्यामुळे सोलापुरी उत्पादनांना नवीन मार्केट शोधण्याची वेळ आता उद्योजकांवर आली आहे.
सोलापुरात टेरी टॉवेल आणि गारमेंटचे उत्पादन मोठे आहे. देशाबाहेर जाणार्या टेरी टॉवेल आणि गारमेंटमधील 25 टक्के निर्यात ही एकट्या अमेरिकेत होते. टेरी टॉवेलची वर्षभरातील एकूण निर्यात 800 कोटी रुपये आहे. यातील 200 ते 225 कोटी रुपयांची निर्यात अमेरिकेत होते. सोलापुरातून अमेरिकेत थेट निर्यात करणारे उद्योजक आहेत, तसेच इतर माध्यमातूनही अमेरिकेत निर्यात होते.
टेरी टॉवेलच्या तुलनेत गारमेंटची निर्यात कमी आहे. वर्षभरात 25 ते 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त तयार कपड्यांची सोलापुरातून अमेरिकेत निर्यात होते. टेरी टॉवेल, गारमेंट आणि इतर वस्त्रोद्योगाची मिळून 250 कोटी रुपयांच्या मालाची निर्यात सोलापुरातून अमेरिकेत केली जाते. ही निर्यात टॅरिफ वॉरमुळे अडचणीत आली आहे. यामुळे सोलापुरातील निर्यातदार, उद्योजकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सोलापुरातील उद्योजकांच्या अर्थकारणावर तसेच येथील रोजगार क्षमतेवरही होणार आहे. वस्त्रोद्योगातील सामान्य कामगारापासून उच्च अधिकार्यांपर्यंत अशा सर्वांचे रोजगार यामुळे अडचणीत येऊ शकतील, अशी सद्यस्थिती आहे.
पंधरा हजार कामगार बेरोजगार होण्याची शक्यता
सोलापुरात पॉवरलूम आणि गारमेंटची निर्यात करणारे 200 उद्योजक आहेत. त्यांच्याकडे 15 हजार कामगार आहेत. अमेरिकेतील निर्यात बंद झाल्यास या उद्योजकांच्या उत्पादन आणि उत्पन्नासह कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. एकूण उत्पादनाच्या 25 टक्के उत्पादन जरी बंद झाले, तरी उद्योजकांची मोठी आर्थिक कोंडी होऊ शकते, अशी सद्यस्थिती आहे. याचा परिणाम कामगारांच्या रोजगारावरही होऊ शकतो. यामुळे नव्या मार्केटचा शोध घेऊन उत्पादन बंद पडणार नाही, याची काळजी आता उद्योजकांना घ्यावी लागणार आहे.
सोलापुरातून निर्यात करण्यात येणार्या टॉवेलपैकी 25 टक्के माल हा एकट्या अमेरिकेत निर्यात केला जातो. सोलापुरातून वस्रोद्योगातून होणारी एकूण निर्यात 800 कोटी रुपयांची आहे. त्यातील 200 ते 225 कोटी रुपयांची निर्यात एकट्या अमेरिकेत होते. वाढलेल्या टॅरिफमुळे ही निर्यात शंभर टक्के बंद होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी आता उद्योजकांना नव्या बाजारपेठेचा शोध घ्यावा लागणार आहे. शासनानेदेखील यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याची गरज आहे. - पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, सोलापूर यंत्रमाग धारक संघ