

सोलापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिकेसाठी मंगळवारी (दि.2) 499 मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. सायंकाळपर्यंत अंदाजे 70 टक्के मतदान झाल्याची माहिती नगरपालिका प्रशासन अधिकारी योगेश डोके यांनी दिली.
दहा नगरपालिका निवडणुकीसाठी 938 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये 62 उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी, तर 876 उमेदवार नगरसेवकपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, कुर्डूवाडी, बार्शी, करमाळा, अकलूज, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला या दहा नगरपालिकेसाठी सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी 11.30 पर्यंत 19.46 टक्के मतदान झाले. दुपारी 1.30 पर्यंत 33.80 टक्के, तर 3.30 पर्यंत 49.08 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5.30 पर्यंत जवळपास 70 टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतरही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
उमेदवारांची धाकधूक वाढली
दहा नगरपालिकेसाठी मंगळवारी मतदान झाले. लगेच बुधवारी (दि.3) मतमोजणी होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मतमोजणीसाठी आणखी 19 दिवस वाट पाहावी लागणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मतदानाची अंदाजे टक्केवारी
अकलूज - 70
कुर्डूवाडी - 71
बार्शी - 60
पंढरपूर - 70
अक्कलकोट - 67
दुधनी - 70.97
करमाळा - 72
मोहोळ - 72
सांगोला - 80
मैंदर्गी - 72.89