

सोलापूर : सोलापूरच्या तापमानात गुरुवारी (दि. 23) दोन अंशानी वाढ झाली. त्यामुळे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, हवामान खात्याने सोलापूर परिसरात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
मंगळवारी रात्री शहर परिसरात अवकाळी पाऊस झाला. परिणामी बुधवारी तापमानात घट झाली. बुधवारी 40 अंश सेल्सिअस तापमान होते. पुन्हा गुरुवारपासून उष्णतेच्या झळा जाणवल्या. तापमान सतत 40 अंशापेक्षा जास्त असल्याने उन्हाळा त्रासदायक ठरू लागला आहे. उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे. शरीराला थंडावा देण्यासाठी ताक, कलिंगड, टरबूज, ज्यूस, लिंबू शरबत, मठ्ठा यासारख्या पेयांना मागणी वाढली आहे.
भारनियमनामुळे त्रासात भर
शहरासह ग्रामीण भागांमध्ये दुरुस्तीच्या नावाखाली विजेचा लपंडाव सुरुच आहे. अघोषित भारनियमनामुळे वीज कधी येते, कधी जाते याची माहिती मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.