

सोलापूर : मार्च महिन्यात पारा चाळिशीवर गेल्यानंतर अवकाळी पावसाने पारा 36 अंशांवरपर्यंत उतरला होता. परंतु, तापमानाने 10 एप्रिल रोजी 40 अंश सेल्सिअस पारा केले आहे. कमाल तापमान 40.0 सेल्सिअस (104.0 फॅरनहाइट) इतके नोंदवण्यात आले आहे. 27 मार्चनंतर पहिल्यांदाच तापमानाने पुन्हा चाळीशीचा टप्पा गाठला असून, येणाऱ्या दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शहरात कोरडे हवामान आणि कडक ऊन पाहायला मिळाल्याने नागरिकांना उष्णतेच्या त्रासाला सामोरे जावे लागले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, एप्रिलचा मध्य जवळ येत असताना सूर्याचा कोप वाढणार आहे. 27 मार्च रोजी तापमानात मोठी वाढ झाल्यानंतर मध्ये काही दिवस किंचित उतार पाहायला मिळाला होता. मात्र, आजच्या 40 अंशांच्या नोंदीने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचे संकेत दिले आहेत.
हवेतील आर्द्रता केवळ 30 टक्के असल्याने कोरड्या उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे. दुपारच्यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू लागला असून नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.