Solapur temperature: सोलापुरात तापमानात चार अंशानी घट

उष्णतेच्या झळा झाल्या कमी, नागरिकांना दिलासा
Solapur temperature
Solapur temperatureOnline Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. पहाटेपासूनच आकाश ढगांनी दाटून आले. अनेक भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उन्हापासून सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला. सकाळी थंड वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुपारपर्यंत शहरात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने उन्हाची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी झाली.

यंदा एप्रिल आणि मे महिना हा अधिक कडक उन्हाळ्याचा राहिला आहे. गुरुवारी 40.9 अंश सेल्सिअस इतका कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यात शुक्रवारी 4.1 अंश सेल्सिअस इतकी घट होत 36.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. सकाळी झालेल्या हलक्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट नोंदवली गेली.

शहरातील विजापूर रोड, होटगी रोड, अक्कलकोट रोड तसेच मध्यवर्ती भागांत सकाळच्या सुमारास हलक्या सरी पडल्या. काही भागांत फक्त ढगाळ वातावरण राहिले, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाडा काही प्रमाणात जाणवत असला तरी सूर्यप्रकाश कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

मान्सूनपूर्व पाऊस कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, 25 मेपासून रोहिणी नक्षत्राच्या पावसाला सुरुवात होत आहे. तर 7 जूनपासून मृग नक्षत्राच्या पावसाला प्रारंभ होत आहे. परंतु एल निनोचा अंदाज मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news