Solapur Accident : टेंभुर्णी बसस्थानकात बसमध्ये चढताना चाकाखाली वृद्धाचा मृत्यू

पुण्याहून गावी परतत असताना काळाचा घाला
Solapur Accident
टेंभुर्णी बसस्थानकात बसमध्ये चढताना चाकाखाली वृद्धाचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पुण्याहून गावी परतत असताना टेंभुर्णी बसस्थानकात बस पकडण्याच्या प्रयत्नात बसचे चाक डाव्या पायावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भालचंद्र भिमराव रोकडे (वय ७०, रा. कासेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. सोमवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

रोकडे हे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-उमरगा बसने पंढरपूरकडे जाण्यासाठी निघाले होते. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ते टेंभुर्णी बसस्थानकात उतरले. तेथून पंढरपूरला जाण्यासाठी दुसरी बस पकडण्याचा त्यांचा विचार होता. पुण्याहून लवकर गावी जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी ते बस पकडण्याच्या प्रयत्नात असताना बसचे चाक त्यांच्या डाव्या पायावरून गेले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सोलापूर शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

रोकडे हे पुण्यात नातेवाइकांकडे गेले होते. तेथील काम आटोपून पहाटे टेंभूर्णी बसस्थानकात उतरले होते. तेथून गावी जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती बसमध्ये चढत असताना ही दुर्घटना घडली. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कासेगावावर शोककळा पसरली आहे.

नातेवाईंकांचा आरोप

बसमधून खाली उतरताना किंवा बस रिव्हर्स घेत असताना वडील गाडी खाली आले असा आरोप मृताचा मुलगा सागर रोकडे यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news