

सोलापूर : पवित्र शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना सोलापुरात घडल्याचे समोर आले आहे. शिक्षक म्हणून नियुक्ती पत्रासह इतरही कामे चक्क माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीद्वारे मार्गी लावल्याची माहिती सूत्रांनी दै ‘पुढारी’स दिली. याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून लवकरच संशयितांना बेड्या पडतील, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप सांगितले.
शिक्षणाधिकारी जगताप यांना याविषयी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने थेट संपर्क केला असता ते म्हणाले, अशी कामे होत असल्याची मलाही शंका आहे. त्यामुळे सर्व कामकाज ऑनलाईन केले. त्यानंतरही काही प्रलंबित कामे माझी बनावट स्वाक्षरी व शिक्क्यानिशी मार्गी लावल्याचे लक्षात आले आहे. यावर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत. शिक्षण विभागात येणाऱ्या प्रत्येक कामाची ऑनलाईन नोंद ठेवली जात आहे. तरीही काही कामे त्यांच्या परस्पर करण्यात येत असल्याचे लक्षात आले आहे.
याविषयी शिक्षणाधिकारी जगताप यांनी आवाहन केले आहे की, शिक्षकांनो तुमचीही अशा पद्धतीने फसवणूक तर होत नाही ना, याविषयी खात्री करा.
बार्शीतून रॅकेट चालत असल्याची शंका
माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्का वापरून विविध शिक्षकांची प्रलंबित कामे करून देण्याचा हा फंडा चक्क जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्याच बार्शी तालुक्यातून सुरू असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.