

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या प्राथमिक शिक्षकांची समायोजन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने अनेक शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून बंद करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या सुधारित संचमान्यतेनुसार जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेनुसार अतिरिक्त घोषित झालेल्या शिक्षकांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करणे अपेक्षित आहे. मात्र, समायोजन प्रक्रिया रखडल्याने अनेक शिक्षकांना नियमित वेतन मिळत नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
शासनाच्या नियमावलीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून थांबविण्यात आले आहे. त्यामुळे समायोजन आदेश निघेपर्यंत शिक्षकांना आर्थिक उत्पन्नाचा कोणताही स्रोत उपलब्ध राहत नाही. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे.