

सोलापूर : नियमित वेतनश्रेणी मिळावी, यासाठी शिक्षिका शीतल काळे यांनी जिल्हा परिषदेत टाहो फोडला. मात्र, शासकीय कामात अडथळा आणल्याचे सांगून शिक्षिकेवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी महिला शिक्षिका शीतल काळे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
नियमित वेतनश्रेणीची मान्यता मिळावी, यासाठी शिक्षिका काळे या माध्यमिक शिक्षण विभागात आल्या होत्या. त्यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सदर बझार पोलिस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर काही वेळात महिला पोलिस दाखल झाल्या. त्यांनी त्या शिक्षिकेला ताब्यात घेतले. त्यावेळी महिला शिक्षिकेने शिक्षणाधिकारी जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले.
दरम्यान, शिक्षिका काळे यांनी नियमित वेतनश्रेणीचा प्रस्ताव तयार करून माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर केला होता. मात्र, शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितलेली अट पूर्ण न केल्याने त्यांनी नियमित वेतनश्रेणीचा प्रस्तावावर निगेटिव्ह मार्किंग केल्याचा दावा शिक्षिका काळे यांनी केला आहे. शिक्षणाधिकारी जगताप यांनी नियम नसतानाही विनाकारण नियम लावून वेतनश्रेणीत त्रुटी काढून प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे.