Pandharpur Sugarcane Protest| ऊस दरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चा एल्गार

तोडगा न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ रोजी धडक मोर्चा
Pandharpur Sugarcane Protest
पंढरपूर : ऊस दराबाबत पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी.
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ३६००, कारखाना बंद झाल्यानंतर १०० रुपये तर पुढील हंगाम सुरू होण्याआधी २०० व साखरेचा दर ४५ रुपयांच्या पुढे राहिल्यास ७०/३० फॉर्म्युलानुसार दर जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रविवारी पंढरपुरात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत केली. १५ नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदार व जिल्हा प्रशासनाने तोडगा न काढल्यास १६ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अद्याप कायम आहे. साखर कारखानदारांनी जाहीर केलेला ३ हजार ते ३ हजार १५० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मान्य नाही. याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऊस दरासंदर्भात पुढील आंदोलनाची रणनीती आणि ठोस भूमिका ठरवण्यासाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. एकिकडे कोल्हापूर जिल्ह्यात ३ हजार ९०० रुपये पहिली उचल जाहीर झाली असताना सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मात्र प्रतिटन केवळ ३ हजार ते ३ हजार १५० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी केवळ दुष्काळाचे कारण पुढे करत नेहमीपेक्षा एक महिना आधीच कारखाने घाईघाईने चालू केले. कारखानदारांच्या या भूमिकेमुळे साखरेच्या दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला असून, जिल्ह्यातील कारखानदारांनी साखर उद्योगाचे वाटोळे लावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार काटामारी व रिकव्हरी चोरी करून लूट करत आहेत व कारखानदारांचा हा नफेखोरपणा आणि शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक आता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. १६ नोव्हेंबरच्या मोर्चात जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होऊन प्रशासनाला आणि कारखानदारांना जाब विचारणार आहेत. त्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आल्यानंतर त्यादिवशी प्रश्न निकाली नाही लागला तर त्याच ठिकाणी राजू शेट्टी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगितल्यामुळे पोलिस प्रशासन व राज्य सरकार समोर पेच निर्माण झाला आहे.

यावेळी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, विजय रणदिवे, शिवाजी पाटील, माजी उपसभापती विष्णू बागल, के. के. पाटील, जिल्हा संघटक शहाजहान शेख, युवराज घुले, माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, माजी जि.प. सदस्य सी.पी. बागल, वृक्षमित्र दत्तात्रय बागल, सिध्देश्वर घुगे, सत्यवान गायकवाड, नितीन बागल, गोडगे, करमाळा तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.