

सोलापूर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रचारासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 12 जानेवारीपासून सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा सुरू होत आहे. त्याचबरोबर संक्रांत हा महिलांचा सण असल्यामुळे पुढील काळात प्रचारासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळणे कठीण होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवार सर्वच राजकीय पक्षांसाठी सुपर संडे ठरला. प्रभाग सात मध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांनी सहभाग नोंदवत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
रविवारी (दि. 11) सोलापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये भव्य पदयात्रांनी संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. सत्ताधारी, विरोधक तसेच अपक्ष उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. प्रत्येक प्रभागात रंगीबेरंगी झेंडे, ढोल-ताशांचा निनाद, स्पीकरवरून सुरू असलेला प्रचाराचा गोंगाट आणि पक्षाच्या विजयाच्या घोषणा यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रभाग सातमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट युतीचे उमेदवारांची प्रचार यात्रा निघाली. प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार, भाजपचे उमेदवार, प्रभाग तीनमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे व भाजपचे उमेदवार, प्रभाग सहा व पंधरामध्ये भाजपच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले.
प्रभाग पंधरामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी, प्रभाग पाचमध्ये भाजप बंडखोर उमेदवारांनी पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. याशिवाय आप, बसपा, माकपा, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात पदयात्रा काढली.
प्रभाग सातमध्ये भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि देवेंद्र कोठे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शहरातील सर्वात जास्त हॉट लढत या प्रभागामध्ये होत आहे. त्यामुळे प्रभाग सातमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे सहभागी झाले होते.
भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागांमध्ये पदयात्रांमुळे रस्त्यांवर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. एकूणच, प्रचाराच्या रणधुमाळीत आजचा रविवार निर्णायक ठरला असून, पदयात्रांच्या झंझावाताने सोलापूरची राजकीय हवा तापली आहे. आता उर्वरित दोन दिवसांत प्रचार आणखी कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रचारगीतांवर ठेका; महिलांची लक्षणीय उपस्थिती
पदयात्रांमध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. संक्रांतीपूर्वीचा प्रचाराचा हा शेवटचा मोठा दिवस असल्याने महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उमेदवारांच्या समर्थनार्थ महिलांनी घोषणा दिल्या, प्रचारगीतांवर ठेका धरला आणि पदयात्रांना वेगळेच चैतन्य प्राप्त करून दिले. उमेदवारांनी पदयात्रांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचण्याचा प्रयत्न केला. विकासकामांची आश्वासने, गेल्या कार्यकाळातील कामांचा पाढा आणि विरोधकांवर टीका करत प्रचाराचा शेवटचा जोर लावण्यात आला.