

सोलापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला. या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील सात ते आठ साखर कारखान्यांनी प्रतिटन ३,१५० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील २४ कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अद्याप फुटली नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, लातूरसह इतर जिल्ह्यांमधील कारखानदारांनी गाळप होणाऱ्या उसासाठीचा दर जाहीर केला. परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोजक्याच, म्हणजेच ७ ते ८ साखर कारखान्यांनी प्रतिटन ३,१५० रुपये इतका दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
ऊस दराची अनिश्चितता अजूनही कायम
जिल्ह्यात एकूण कारखान्यांची संख्या पाहता अजूनही तब्बल २४ कारखान्यांनी आपला दर जाहीर केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऊस दराबाबतची अनिश्चितता अजूनही कायम आहे.