Solapur News : अखेर ऊस दराची कोंडी फुटली

३ हजार २५० रुपये पहिली उचल, पुन्हा १००चे दोन हप्ते
Solapur News : अखेर ऊस दराची कोंडी फुटली
Published on: 
Updated on: 

सोलापूर : जिल्ह्यातील ऊस दराचा अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर शनिवारी मध्यरात्री दीड वाजता संपुष्टात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कारखानदारांनी प्रतिटन ३ हजार ४५० रुपयांचा प्रस्ताव मान्य केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली. हा तोडगा निघाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर शेतकऱ्यांनी जल्लोष केला.

ऊस दरासाठी १६ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. शेतकरी संघटनांनी ३ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती, तर कारखानदार ३ हजार १५० रुपये देण्यास तयार होते. अखेर चर्चेतून ३ हजार ४५० रुपयांचा फॉर्म्युला निश्चित झाला. यानुसार ३ हजार २५० रुपये पहिली उचल, गळीत हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि साखरेचा सरासरी विक्री दर प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक मिळाल्यास ७०:३० सूत्रानुसार आणखी १०० रुपये दिले जाणार आहेत.

ऊस दराची कोंडी फुटल्याने २४ नोव्हेंबरचे प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी ही माहिती दिली.

३ हजार ४५० दर देणाऱ्या कारखान्यांनाच ऊस द्या

सुरुवातीला जिल्ह्यातील सात ते आठ कारखान्यांनी ३ हजार ४५० रुपये दर देण्याबाबत संमतीपत्रे दिली आहेत. उर्वरित कारखान्यांनीही हा दर मान्य करावा, असे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. ज्या कारखान्यांकडून ३ हजार ४५० रुपये दर मिळेल, त्यांनाच शेतकऱ्यांनी ऊस द्यावा, असे विजय रणदिवे यांनी सांगितले. सांगली, सातारा, पुणे आणि कर्नाटकातील कारखान्यांकडून ३ हजार ६०० ते ३ हजार ९०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडे पर्याय खुले आहेत, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.