

सोलापूर : अल निनोमुळे पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा उसाची अपेक्षित वाढ झालेली नसल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर बाजारात तुटवडा निर्माण होऊन साखरेचा दर गगनाला भिडला आहे. त्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त कार्यालयाने सन २०२६-२७ या वर्षाच्या ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे.
येत्या सोमवारी, दि.१ सप्टेंबर ते दि. ३० सप्टेंबर या कालावधीत संबंधित साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर ऊस हंगाम सुरू करण्यासंदर्भात राज्य शासन स्तरावरून तारीख निश्चित होणार आहे. गाळप हंगामापूर्वी संबंधित कारखान्यांना थकीत शासकीय भागभांडवल, कर्ज व हमीशुल्क रकमा संबंधित सहकारी साखर कारखान्यांनी शासन निर्णयानुसार निश्चित करून दिलेल्या वेळेपूर्वी शासकीय भागभांडवल, कर्ज व हमीशुल्क रकमा भरणा करावे लागणार आहे.
तसेच मागील हंगामातील संपूर्ण ऊस बिल अदा करणे बंधनकारक केल्याची अट टाकण्यात आली आहे. गाळप हंगाम २०२६-२७ साठी ऊस नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची यादी साखर आयुक्तालयामार्फत विकसित करण्यात आलेल्या "महा-ऊस नोंदणी" ॲपमध्ये ऑनलाईनद्वारे अपलोड करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नेमके ऊस क्षेत्र निश्चित होणार आहे.
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, कारखान्याचे कर्मचारी यांचेकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून या कार्यालयास प्राप्त झाल्याने साखर कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती अधिकारी यांची नेमणूक करण्याचे निर्देशही दिले आहेत.
काटा पेमेंटसाठी बंदी
गेल्या वर्षी काही साखर कारखान्यांनी ऊस मिळविण्यासाठी काटा पेमेंट केले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना ऊस देयक रोख स्वरुपात (काटा पेमेंट) अदा करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरच ऊस देयक रक्कम जमा करावी, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील बिगर सभासदांना ऊसदर समान देण्यात यावा, कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांनाही शासनाचे धोरणानुसार उसाचा दर देणे बंधनकारक केले आहे.