

सोलापूर : शिक्षण आणि नोकरीच्या बदलत्या गरजा ओळखून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना भविष्याच्या तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्र आणि कॉप्युक्स टेक्नॉलॉजी ॲनलिटिक्स, मुंबई या अग्रगण्य संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक स्तरावर अत्यंत मागणी असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्टिफिकेट कोर्सेस सोलापूर विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत.
या करारामुळे विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या उद्योन्मुख क्षेत्रातील अत्यंत मागणी असलेले सर्टिफिकेट कोर्सेस शिकण्याची अमूल्य संधी मिळाली आहे.
या करारानुसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एआय क्षेत्रातील तीन अत्यंत महत्त्वाचे आणि नोकरी-केंद्रित सर्टिफिकेट कोर्सेस शिकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन मशीन लर्निंग, सर्टिफिकेट कोर्स इन जनरेटिव्ह एआय आणि सर्टिफिकेट कोर्स इन डीप लर्निंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार रेकॉर्डेड क्लासेस पाहता येतील आणि प्रॅक्टिकल्स करता येतील. ही कॉर्पोरेट कंपनीचे प्रशिक्षण असल्यामुळे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातप्लेसमेंटची संधी उपलब्ध होणार आहे.