

सोलापूर : जिल्ह्यातील शाळा तसेच धोकादायक वर्गखोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले आहेत. मात्र, हे ऑडिट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, त्यासाठीचा खर्च कोण करणार, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने यांनी अध्यक्ष वैद्य यांना केला आहे.
तसेच याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व सर्व विभागप्रमुखांची बैठक लावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी अध्यक्ष वैद्य यांच्याकडे केली आहे. यावेळी बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता आसिफ खैरादी उपस्थित होते.
शाळांच्या इमारतींची सुरक्षितता हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक असले तरी त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूदही तातडीने करणे गरजेचे आहे. निधी उपलब्ध नसताना ऑडिटचा आदेश देऊन पुढील कार्यवाही कशी होणार, असा प्रश्न माने यांनी उपस्थित केला.
अध्यक्ष वैद्य यांचे आश्वासन
स्ट्रक्चरल ऑडिटसाठी निधीची तरतूद, ऑडिट कार्यपद्धती व धोकादायक वर्गखोल्यांबाबत पुढील उपाययोजना निश्चित कराव्यात, अशी मागणी माने यांनी अध्यक्ष वैद्य यांच्याकडे केली. लवकरच सीईओ व विभागप्रमुखांची बैठकीतून प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन अध्यक्ष वैद्य यांनी दिलेे.