Solapur News: रस्त्यांवर भटक्या जनावरांचा वावर; अपघाताचा धोका

शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये भटक्या जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे
Solapur News: रस्त्यांवर भटक्या जनावरांचा वावर; अपघाताचा धोका
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये भटक्या जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्यांवर गाय, बैल तसेच गाढवे भररस्त्यात उभी राहत असल्याने वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी ही समस्या अधिक तीव्र होत आहे. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.

जुना एम्पालयमेंट चौक, होटगी रोड, विजापूर रोड, रेल्वे स्टेशन परिसर, अशोक चौक, तसेच इतर प्रमुख चौकांमध्ये भटक्या जनावरांचे कळप दिसून येत आहेत. अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकीस्वारांना ब्रेक मारावे लागते. अनेकदा किरकोळ अपघात घडत आहेत.

विशेष म्हणजे, शहरात मोकाट फिरणाऱ्या अनेक गायींच्या कानावर ओळख पटविणारे टॅग लावलेले दिसतात. त्यामुळे या जनावरांचे मालक असतानाही त्यांना रस्त्यावर मोकाट सोडले जात असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने अशा जनावरांच्या मालकांवर कारवाई करून भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा. तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या जनावरांना तातडीने हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाचे डोळे उघडणार कधी?

शहरात रस्त्यावर मोकाट जनावरे फिरतात. याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नाही. त्यांची जनावरांना पकडण्याची गाडी दिसेनाशी झाली आहे. मोकाट जनावरांमुळे अपघाताचा धोका असतो. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news