

सोलापूर : परिवहन महामंडळाच्या येथील मध्यवर्ती बसस्थानकातून तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येक अर्ध्या तासाला बस सोडण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला आहे. या निर्णयाने शहर जिल्ह्यातील देवी भक्तांची चांगली सोय झाली आहे.
दसरा सणाच्या काळात गर्दी होत असते. गर्दीत जाण्यापेक्षा अनेक भाविक या सणाच्या अगोदरच दर्शन घेण्याला पसंदी देतात. याच गोष्टीचा विचार करून दसरा सणाच्या धर्तीवर महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालय प्रशासनाकडून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच, प्रत्येक अर्ध्या तासाला तुळजापूरच्या मार्गावर बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे, भाविकांची चांगली सोय होणार आहे. या बसेस विना थांबा धावणार असल्यामुळे कमी वेळात तुळजापूरला जाऊन परत गावी जाता येते. प्रत्येक अर्ध्या तासाला बस धावणार असल्याने कमी वेळात भाविकांना दर्शन घेऊन मूळ गावी परतता येणार आहे. ही विना थांबा जाणारी बस सध्या हाऊसफुल्लच धावत आहे. येथील मध्यवर्ती बसस्थानक प्रशासनासह तुळजापूरच्या स्थानक प्रशासनानेही या मार्गावर प्रत्येक अर्ध्या तासाला बस सोडण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बस स्थानक प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे या मार्गावर विना थांबा ४८ बसेस धावतील.
प्रवाशांच्या हिताचा निर्णय; धावणार ४८ बस
तुळजापूरच्या बसस्थानक प्रशासनाने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विनाथांबा धावणाऱ्या ४८ बसेसच्या माध्यमातून एकाच दिवशी अडीच हजारपेक्षा अधिक प्रवाशांना तुळजापूरला जाता येते व परत गावीही जाता येऊ शकते. एसटीच्या या निर्णयाचे सामान्य प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.