नातेपुते; पुढारी वृत्तसेवा : नातेपुते पासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर एसटी आणि ट्रकमध्ये जोराची धडक झाली. रविवारी (दि. २७) सकाळी १२ वाजताच्या सुमारास समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत ट्रक चालक जागीच ठार झाला. तर एसटी मधील १४ प्रवासी जखमी आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र परिवहन बस (क्र. एम एच १४ बी टी ३१२२) पुणेहून मंगळवेढाकडे निघालेली होती. मांडवे पाटी ब्रिजजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (क्र. एम एच. ४६ बी बी. २२४३) आणि एसटीमध्ये जोराची धडक झाली. यामध्ये शंकर कुमार मंडल (रा.पुनिया, वय २४, मु.पो. बिहार) या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर १४ बस प्रवासी जखमी झाले. यातील ३ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले असून, ११ प्रवासी किरकोळ जखमींवर नातेपुते ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत.
या अपघातातील ट्रक हा महामार्ग निर्माण करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा आहे. महामार्ग निर्माणासाठी होत असणाऱ्या अवजड वाहतुकी दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या या ट्रकची आणि एसटीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला अशी माहिती दिली जात आहे.
किसन गुलाबराव बारवकर, सदाशिव दादा शेळके, फुलाबाई न्यानोबा राऊत, ज्ञानोबा तुकाराम राऊत, जालिंदर काशिनाथ टिंगरे, शारदाबाई शिवाजी फलके, आशाबाई नामदेव आघाव, अभिषेक पिंटू राठोड, निकिता कृष्णकांत केंदळे, सुदर्शन विठ्ठल ताणगावडे, सिद्धनाथ नारायण अवताडे, राजाराम रामचंद्र बारवकर, मनोहर रंगनाथ पदे अशी जखमींची नावे असून यापैकी सुदर्शन विठ्ठल तानगावडे, ज्ञानोबा तुकाराम राऊत, मनोहर रंगनाथ पदे यांना गंभीर मार लागल्याने तातडीने त्यांना सोलापूर सिव्हिल रुग्णालय येथे पाठवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच जखमींना रुग्णालयात पाठवून गंभीर जखमींना सोलापूर येथे पाठवून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या माध्यमातून सर्व जखमीवर तातडीचे उपचार मिळण्याच्या दृष्टीने सोय केली आहे.
हा महामार्ग निर्माण करणारी यंत्रणा असलेली कंपनी महामार्गावर मालवाहतूक करणारे वाहने सरळ व विरुद्ध मार्गाने वाहतूक करतात. यांच्या वाहनांमध्ये ओव्हरलोड दगड, माती सतत पाहायला मिळते रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही फलक अथवा काळजी घेतलेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेळीच लक्ष देऊन ठोस पावले उचलून उपायोजना कराव्या अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे.
महामार्ग निर्माण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने वेळीच कार्यपद्धत बदलली नाही तर शिवसेना पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला राजकुमार हिवरकर (शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख शिंदे गट) या शिवसेना कार्यकर्त्याकडून देण्यात आला.