

सोलापूर : महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्याला पुन्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केल्याने सोलापूर जिल्ह्याचा पर्यटन विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंढरपूरची आषाढी-कार्तिकी वारी, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर, बार्शीचे भगवंत मंदिर यांसह सिद्धेश्वर, हत्तरसंग कुडल, तुळजापूर-सोलापूर परिसराशी जोडणारी धार्मिक पर्यटनाची क्षमता मोठी आहे. त्या अनुषंगाने सोलापूरला स्वतंत्र ‘आध्यात्मिक पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करण्याची मागणी होत आहे.
नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्याचा निर्णय १६ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. नागपूरला यापूर्वी २०१६ च्या पर्यटन धोरणात विशेष पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला होता. २०२४ मधील धोरण बदलानंतर हा दर्जा काढण्यात आला होता. आता तो पुन्हा बहाल करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधी, पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने सोलापूरला स्वतंत्र ‘आध्यात्मिक पर्यटन जिल्हा’ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे मांडण्याची गरज आहे. वारी, स्वामी समर्थ, भगवंत, सिद्धेश्वराचे धार्मिक वैभव आणि उजनीचे जलपर्यटन यांची सांगड घातल्यास सोलापूरला स्वतंत्र पर्यटनाची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे.
सोलापूरसाठी २८२.७५ कोटींचा आराखडा
पर्यटन विकासासाठी उजनी जलाशय, जलपर्यटन, धार्मिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन आणि विनयार्ड पर्यटन यांचा समावेश असलेल्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला २८२.७५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून पंढरपूर, अक्कलकोट आणि बार्शी ही प्रमुख धार्मिक केंद्रे आहेत. त्यासाठी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी पुढे येत आहे.
पर्यटक तीन दिवस थांबतील अशी व्यवस्था
जिल्ह्यात आध्यात्मिक पर्यटन सर्किट विकसित झाल्यास सोलापुरात येणाऱ्या पर्यटकांना किमान तीन दिवस जिल्ह्यात थांबवून धार्मिक आणि पर्यटनस्थळांचा अनुभव देण्याची क्षमता आहे. त्यासाठी खूप मोठा वाव आहे. पंढरपूर-अक्कलकोट-बार्शी यांच्यासह सिद्धेश्वर मंदिर, हत्तरसंग कुडल संगमेश्वर, उजनी परिसर आणि अन्य धार्मिक व पर्यटनस्थळांना एकाच सर्किटमध्ये जोडण्याची संधी आहे.