

सोलापूर : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सोलापूर शहराला करोडोंनी निधी मिळाला. तो खर्च झाल्याचे कागदोपत्री घोडेही नाचवण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र सोलापूरकर किती स्वच्छ हवा घेतात? यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सोलापूर शहराला आर्थिक वर्ष २०१९-२० पासून टप्प्याटप्प्याने निधी मंजूर व वितरित करण्यात आला. सुरुवातीला २०१९-२० ते २०२१-२२ या तीन वर्षांत सोलापूरला एकूण ४ कोटी ७८ लाख रुपये निधी देण्यात आला. हा निधी अनुक्रमे ०.२० कोटी, ०.३८ कोटी आणि ४.२० कोटी रूपये असा वितरित करण्यात आला.
तसेच हा सर्व निधी पूर्णपणे वापरला गेला. त्यापुढे २०२२-२३ नंतर शहराच्या कृती आराखड्यानुसार एकूण मंजूर निधी ४६ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. डिसेंबर २०२३ पर्यंत यातील ३१ कोटी ७२५ लाख रुपये प्रत्यक्षात सोलापूर महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला. केंद्र सरकारने २०१७-१८ च्या तुलनेत २०२५-२६ पर्यंत हवेतील प्रदूषक कण ४० टक्केपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
परंतु प्रत्यक्षात तसे झाल्याचे दिसत नाही. हरितीकरण आणि जनजागृतीसाठी चौकांचे सुशोभीकरण, वृक्षारोपण, हरितपट्टे विकसित करणे आणि हवा प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे अपेक्षित आहे. परंतु वास्तवात याबद्दल काहीच दिसत नाही. हवा गुणवत्ता मापनसाठी शहरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित ठेवणे अपेक्षित असताना, तसे झाल्याचेही दिसत नाही.