Solapur News : गतिरोधक दिसेनात, अपघात काही केल्या थांबेनात

शिक्षिकेच्या मृत्यूनंतर नागरिक रस्त्यावर, निष्पापांचे बळी थांबवा म्हणत आंदोलन
Solapur News : गतिरोधक दिसेनात, अपघात काही केल्या थांबेनात
Published on: 
Updated on: 

सोलापूर : शहरातील रस्त्यांवरील गतिरोधक वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी की अपघाताला निमंत्रण देण्यासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे. बहुतांश गतिरोधकांवरील पांढरे पट्टे पुसट झाले आहेत, तर काही ठिकाणी पट्टेच मारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात गतिरोधक दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

सात रस्ता ते पत्रकार भवन मार्गावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गतिरोधकावरून दुचाकीस्वार उडून दोघे जखमी झाले. या घटनांनंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि. ३) आंदोलन करत गतिरोधकांचे ऑडिट करून ते नियमानुसार करण्याची मागणी करण्यात आली.

सात रस्ता ते पत्रकार भवन मार्गावर १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिक्षण परिषदेची बैठक आटोपून शीला सुजित हावळे (रा. देगाव, ता. उत्तर सोलापूर) या पतीसोबत दुचाकीवरून जात होत्या. गतिरोधक न दिसल्याने दुचाकी त्यावर आदळली. मागे बसलेल्या हावळे रस्त्यावर जोरात पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा उपचारादम्यान मृत्यू झाला. हावळे यांच्या अपघातानंतर त्याच गतिरोधकावर रात्री पांढरे पट्टे मारण्यात आल्याचा आणि गतिरोधकाचा फलकही लावण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नागरिकांनी अपघातस्थळी आंदोलन केले. ‘सदोष स्पीड ब्रेकर की जीवघेणा गतिरोधक?’, ‘स्पीड ब्रेकर नियमानुसार करा, निष्पापांचे बळी थांबवा’, ‘सात रस्ता अपघातातील मृताला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा आशयाचे बॅनर घेत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

गतिरोधक की मृत्युचा सापळा?

शहरातील अनेक गतिरोधकांवरील पांढरे पट्टे पुसट झाले आहेत. काही गतिरोधकांवर पट्टेच नसल्याने रात्री ते वाहनधारकांना दिसत नाहीत. त्यामुळे शहरातील सर्व गतिरोधकांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करून त्यांची उंची, रुंदी, रंगकाम आणि सूचना फलक नियमानुसार आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

सात रस्ता परिसरातील गतिरोधकावर शीला हावळे यांच्या अपघातानंतर रात्री पांढरे पट्टे व बोर्डही लावण्यात आला. गतिरोधक चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहेत. शहरातील गतिरोधकांचे ऑडिट होणे आवश्यक आहे. शीला हावळे मृत्यू प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
- साजन आवळे, मृत शिक्षिकेचे नातेवाईक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news