

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती, उपसभापती कोण होणार याविषयी चर्चा झाली नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपानंतरच बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीची निवड करू, अशी माहिती आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, माजी आ. दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांनी शुक्रवारी (दि. 9) मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यावेळी सभापती कोण होणार याची चर्चा झाली नसल्याचे आ. कल्याणशेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, बाजार समितीच्या सभापतीपदी प्रारंभी दोन वर्ष माजी आ. माने यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, सभापती पदासाठी हसापुरे, शिवदारे इच्छुक असल्याने ऐनवेळी त्यांच्यातील एकाचे नाव पुढे येईल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. त्यामुळे सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार ते रविवारी (दि. 11) कळेल.
मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गोरे, आ. कल्याणशेट्टी, आ. कोठे आणि माजी आ. माने यांच्यात बंद खोलीत सभापती, उपसभापती निवडीविषयी चर्चा झाली. मात्र, सभापती, उपसभापती कोण होणार, याची नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.