Solapur News: सोनके तलाव नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने भरा

पाणी न सोडल्याने तलाव कोरडाच, १८ ऑगस्ट रोजी करणार ठिय्या आंदोलन
Solapur News: सोनके तलाव नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने भरा
Published on
Updated on

पंढरपूर : गेल्या महिनाभरापासून नीरा उजवा कालव्याचे पाणी सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील विविध तलाव, बंधारे भरून घेण्यात येत आहेत. मात्र प्रकल्प अहवालात तरतूद असूनही पंढरपूर तालुक्यातील तिसंगी सोनके तलावात अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील नऊ गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी तसेच वीर धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. दरवेळी वीर धरण १०० टक्के भरल्यानंतर नीरा उजवा कालव्याच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील माध्यम प्रकल्प असलेल्या तिसंगी सोनके तलावात पाणी सोडण्यात येऊन तो भरून घेतला जातो. या तलावावर सोनके, पळशी, उपरी, गादेगाव, भंडीशेगाव, वाखरी, शेळवे, कौठाळी, खेड भाळवणी ही गावे अवलंबून आहेत. गेल्या महिन्याभरापासून उभ्या पिकांना पाणी सुरू असल्याचे सांगत तलावात पाणी सोडण्यास विलंब केला जात आहे.

तिसंगी सोनके तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी दरवेळी संघर्ष करावा लागत आहे, आंदोलन करावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी दिगंबर वाघमारे यांनी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या मयुरी बागल तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने शाखा अभियंता अभिजित नवले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागेश बागल, आनंद बागल, दीपक शिंदे, बाळासाहेब यलमार आदींसह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news