

माढा : माढा शहरातील शिवप्रेमींच्या अनेक वर्षांच्या अपेक्षेला आता मूर्त स्वरूप मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रशासकीय टप्पा पूर्ण झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जागा माढा नगरपंचायतीला प्रदान करण्याचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आला आहे. आ. अभिजित पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून या विषयासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश मिळाले आहे.
माढा शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, आकर्षक पुतळा आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचा आ. अभिजित पाटील यांचा मानस आहे. मात्र, स्मारक उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्न प्रशासकीय स्तरावर प्रलंबित होता. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार पाटील यांनी शासन, महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित मंत्री, पालकमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती.
अखेर या प्रयत्नांना यश आले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जागा नगरपंचायतीला प्रदान करण्याचा आदेश पारित केला आहे. त्यामुळे या जागेच्या उपलब्धतेसंदर्भातील महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी पारगे, प्रांताधिकारी, तहसीलदार, माढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांचे आ. पाटील यांनी आभार मानले.
आणखी पाच कोटींसाठी प्रयत्न
माढा नगरपंचायतीसाठी सुसज्ज आणि भव्य प्रशासकीय इमारत उभारण्याचाही आमदार पाटील यांचा मानस असून, त्यासाठी आणखी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने स्मारक आणि प्रशासकीय इमारत हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्मारक उभारण्याबाबत आ. अभिजित पाटील यांनी आश्वासन दिले होते. निधी आणि जागेचा प्रश्न सोडवून त्यांनी हा शब्द पाळला.