

बाशी : शिवजयंतीनिमित्त बार्शीत शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा नेत्रदीपक पालखी सोहळा झाला. पुर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी झाली.
शिवाजी महाविद्यालयासमोरील व शिवसृष्टी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दर्शनासाठी शिवभक्तासह महिलांनी मोठी गर्दी केली होती. बार्शीतील अलिपूर रोड, उपळाई रोड, सोलापूर रोड, लातूर रोड, तुळजापूर रोड बरोबरच पांगरी, आगळगाव, कुसळंब, चिखर्डे, गौडगाव,मळेगाव, घारी आदी ठिकाणीही शिवजयंती साजरी करण्यात आली.
आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून पालखीचा शुभारंभ झाला. पालखीसमोर पारंपारिक पोशाखात घोडेस्वार मावळे, झांज पथक होते. शहरात पालखीचे ठिकठिकाणी गुलाब पुष्प टाकून स्वागत करण्यात आले. पालखी स्वागतासाठी ठिकठिकाणी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. हा पालखी सोहळा गेल्या 15 वर्षापासून एक प्रेरणादायी सोहळा बनला आहे. पालखी मार्गावर पाणी पाऊच, मसाले दूध, आईस्क्रिम आदीचे वाटप करण्यात आले. समाजामध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शिवभक्तांनी सोहळ्याच्या शेवटी मार्गावरील स्वच्छता मोहीम राबवली.